केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह आजपासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर
प्रमुख मार्ग ‘नो पार्किंग’; दोन हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कोल्हापूर, ता. १८ (प्रतिनिधी) :– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (शुक्रवारी) दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवारी होणाऱ्या विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने शहरातील प्रमुख मार्गांवर विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
व्हिआयपी वाहनताफ्याची ये-जा सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी विमानतळ ते शाहू टोल नाका, कोयास्को चौक, ताराराणी चौक, खानविलकर पेट्रोल पंप, धैर्यप्रसाद चौक, पोलिस अधीक्षक कार्यालय चौक, शासकीय विश्रामगृह तसेच दसरा चौकमार्गे बिंदू चौक या मार्गांवर ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आले आहे. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय चौक ते धैर्यप्रसाद चौक या मार्गावर शासकीय आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तावडे हॉटेल-कोयास्को चौक ते ताराराणी चौक मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली असून शिये-कसबा बावडा मार्गावरील अवजड वाहतूक पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून वळविण्यात आली आहे.
दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही एकेरी मार्गांवरील वाहतुकीच्या नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्यात आली आहे.
दौऱ्यादरम्यान मान्यवर आणि नागरिकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी अलंकार हॉल परिसर, सभास्थळावरील व्यासपीठामागील जागा आणि पोलिस मुख्यालय परिसर निश्चित करण्यात आला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी महासैनिक दरबार हॉल, शासकीय विश्रामगृहासमोरील मोकळी जागा आणि मेरीवेदर मैदान येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात झाली रंगीत तालीम
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी धैर्यप्रसाद हॉल येथे बंदोबस्ताचे नियोजन आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विमानतळ, शासकीय विश्रामगृह, पोलिस परेड मैदान, अंबाबाई मंदिर आणि इचलकरंजी येथील कार्यक्रमस्थळांपर्यंतच्या मार्गांवर रंगीत तालीम घेण्यात आली.


