कवलापूर नळपाणीपुरवठा योजनेतील अनियमिततेची चौकशी करा; ग्रामस्थांची मागणी
मिरज (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नळपाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता अमित आडे यांना निवेदन सादर केले. यावेळी आडे यांनी प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
निवेदनात म्हटले आहे की, कवलापूर येथे राबविण्यात आलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असून मूळ मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण झालेले नाही. आराखड्यातील काही कामे अपूर्ण राहिली असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे पाईप बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच काही भागांत पाईपलाईनला वारंवार गळती होत असल्याने योजनेच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गळतीची दुरुस्ती करताना नियमानुसार साहित्य वापरण्याऐवजी पीव्हीसी पाईप व इतर तात्पुरत्या साधनांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय योजनेत जुन्या व्हॉल्व्हचा वापर करण्यात आल्याचे तसेच पाईपलाईनसाठी करण्यात आलेल्या खुदाईच्या कामाबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. योजनेसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची तांत्रिक व सखोल चौकशी करून मंजूर आराखडा, प्रत्यक्ष झालेले काम आणि वापरण्यात आलेल्या साहित्याची पडताळणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदार, अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, कार्यकारी अभियंता अमित आडे यांनी उपअभियंत्यांना कवलापूर येथे प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी भाजपचे कवलापूर येथील निवास पाटील, प्रवीण पाटील, वसंतदादा पाटील पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष गजानन सावंत, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष गजानन यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद पवळ, सुयश पाटील, रामचंद्र पाटील, प्रवीण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


