पोलीस महानिरीक्षकांच्याहस्ते मेरीट फेलोशिप प्रदान

0
WhatsApp Image 2026-06-11 at 6.05.31 PM

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ‘मेरीट फेलोशिप’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आय.जी.सी. फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला ट्रॉफी, सन्मानपत्र आणि रोख पाच हजार रुपयांची शैक्षणिक मदत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांना भविष्यातही कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर उच्च शिखरे गाठण्याचा संदेश दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीवही जपली पाहिजे, असे प्रतिपादन केले. मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विधायक उपक्रमांना प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सैय्यद, महासचिव सुफियान पठाण तसेच आय.जी.सी. फोरम, पुणेचे अध्यक्ष डॉ. के. जी. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *