शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया – आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे
आरग जि.प. शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव उत्साहात
मिरज (प्रतिनिधी)
शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया असून ग्रामीण भागातील प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी केले. आरग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत आणि पालकांच्या मोठ्या प्रतिसादात हा कार्यक्रम संपन्न झाला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत आनंददायी आणि उत्सवी वातावरण निर्माण करण्यात आले होते. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टाळ्यांचा कडकडाट आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते. पालकांनी आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळांच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेची शैक्षणिक वाटचाल, विविध उपक्रम आणि आगामी नियोजन याबाबत माहिती दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पं.समिती सदस्य विनोद गायकवाड, वसंत आण्णा खोत, माजी.जि.प.सदस्य सौ.सरीता कोरबू, सरपंच सौ.अमृता नागठाणे, किरण पाटील, माजी उपसरपंच सर्जेराव खटावे, सुभाष खोत, डाॅ.अनिल कोरबू, अजित कांबळे, गटशिक्षण अधिकारी शेख, जि.प.शाळा नं.1 चे मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे व सर्व शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सदस्य व पालक उपस्थित होते.


