चरणच्या पीएमश्री विद्यामंदिरात शिक्षकांची तातडीने नियुक्ती करा.. अन्यथा २८ सप्टेंबरला शाळा बंद आंदोलनाचा इशारा

0
WhatsApp Image 2026-09-24 at 2.15.12 PM

जि. प. सदस्य अमरसिंह पाटील यांचा शिक्षण विभागाला इशारा

सरूड (प्रतिनिधी): शाहूवाडी तालुक्यातील चरण येथील ‘पीएमश्री विद्यामंदिर’मध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पदवीधर शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी अथवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह हंबीरराव पाटील (भैय्या) यांनी केली आहे. या संदर्भात २८ सप्टेंबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास शाळा बंद आंदोलन करून शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी शिक्षण विभागाला दिला आहे.

​या संदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चरण येथील पीएमश्री विद्यामंदिरातील पदवीधर अध्यापक शिवाजी केशव पाटील यांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती होऊन मार्च २०२५ मध्ये बदली झाली. त्यानंतर विषय शिक्षिका कविता शंकर मगदूम यांचीही ऑक्टोबर २०२५ मध्ये बदली झाली. मात्र, या दोन महत्त्वाच्या शिक्षकांच्या बदलीनंतर इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गांवरील अध्यापनासाठी अद्याप एकाही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

​पटसंख्या घटतेय, पालक गोळा करतायत वर्गणी!

निवेदनात शाळेच्या घसरत्या पटसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शाळेची पटसंख्या २०२२-२३ मध्ये २०५ होती, ती २०२३-२४ मध्ये १७८, २०२४-२५ मध्ये १५८ आणि चालू शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) थेट १२९ वर आली आहे. पटसंख्या वेगाने घटत असताना दुसरीकडे आवश्यक शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे.

​विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा व शिक्षक उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. परंतु, प्रशासन सुस्त असल्याने गावातील पालक व ग्रामस्थांना स्वतः वर्गणी गोळा करून दोन खाजगी शिक्षकांची व्यवस्था करावी लागत असल्याचा गंभीर आरोप अमरसिंह पाटील यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

​प्रशासनाने या बाबीची तत्काळ दखल घेऊन २८ सप्टेंबरपर्यंत येथे कायमस्वरूपी किंवा पर्यायी शिक्षकांची नियुक्ती करावी; अन्यथा ग्रामस्थ व पालकांच्या साथीने ‘शाळा बंद’ आंदोलन छेडून शाळेला टाळे ठोकले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *