न्यू इंग्लिश स्कूल यळगुड विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त
कर्मवीर व्याख्यान सभा कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोल्हापूर. (प्रतिनिधी) यळगूड येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, यळगूड विद्यालयांमध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक पद्मश्री डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी यळगूड गावचे सुपुत्र व विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगावचे मराठी विभागप्रमुख डॉ.सर्जेराव पद्माकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रा. डॉ. बळवंत मगदूम राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज,कोल्हापूर हे सदर कार्यक्रमास मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून कर्मवीर आण्णांच्या जीवन कार्याचा चित्रपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला व आण्णांनी दिलेल्या ‘कमवा व शिका’ या मूलमंत्राचा आपल्या जीवनात अवलंब करून स्वावलंबी बनण्याविषयी विद्यार्थ्यांना आव्हान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सर्जेराव पद्माकर यांनी विद्यार्थी दशेत विद्यालयाकडून मिळालेले शिस्तीचे धडे व शिक्षकांनी लावलेली अभ्यासाची सवय यामुळेच जीवनात यशस्वी होऊन प्राध्यापकपदापर्यंत झेप घेतल्याच्या भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रमांमध्ये डॉ.सर्जेराव पद्माकर यांचेकडून आपले आजोबा कै.आण्णाप्पा आप्पा कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एस.एस.सी.बोर्ड परीक्षा मार्च 2026 मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक कोरे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता राबविलेले सहशालेय उपक्रम,तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये व क्रीडा स्पर्धेमध्ये मिळविलेले यश आणि विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत केंद्रस्तरावरती मिळविलेला प्रथम क्रमांक व अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांचेमार्फत विद्यालयास मिळालेला जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार याची ओळख मान्यवरांना करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता कोळी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास दादासाहेब मगदूम हायस्कूल व जुनिअर कॉलेज कसबा सांगाव चे माजी प्राचार्य श्री.आदिनाथ नरगच्चे, यळगूड गावचे पोलीस पाटील श्री. प्रकाश लोहार उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती अर्चना इंग्रोळे मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपशिक्षक संदीप पोवार, माधुरी पाटील, कुमारी पी.एस.पाटील, धनश्री कोळी, विवेक घुणके, सेवक आण्णासो पुजारी यांचे सहकार्य लाभले.
00000


