सेवा, संवेदना आणि पर्यावरण संवर्धन हाच गणेशोत्सवाचा खरा संदेश – स्वाती खाडे
गणेशोत्सवात राबवला ‘एक पेड गणेशजी के नाम’ हा पर्यावरणपूरक उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
गणेशोत्सवाचे औचित्य साधत महिला बेघर निवारा केंद्र, मिरज येथे सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविण्यात आला. स्वातीताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली “एक पेड गणेशजी के नाम” हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. यावेळी निवारा केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करून गणेशभक्तीसोबत वृक्षसंवर्धन, सामाजिक सेवा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
यावेळी स्वातीताई खाडे यांनी महिला लाभार्थींशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यविषयक समस्या, रोजगाराच्या संधी, निवासाची परिस्थिती तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे की नाही, याची माहिती जाणून घेतली. महिलांनी मांडलेल्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून आवश्यक मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सण-उत्सवांच्या माध्यमातून आनंद वाटतानाच गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या उपक्रमासाठी संस्थेच्या कार्यवाह सुरेखा शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


