‘मदनी’ ट्रस्ट व आयजीसी फोरमतर्फे मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
सांगली (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, डिजिटल कौशल्ये विकसित व्हावीत आणि त्यांना भविष्यातील संधींसाठी सक्षम करता यावे, या उद्देशाने मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली व आयजीसी फोरम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एक महिना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास वाईस ॲडमिरल एन. एम. नदाफ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक फिरोजभाई पठाण व ॲड. रियाज जमादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफीज सद्दाम सैय्यद, महासचिव सुफियान युसूफ पठाण, आयजीसी फोरमचे के. जी. पठाण, सचिन कोळी, समीर मुजावर, आयशा शेख, आर्किटेक्ट सिकंदर नदाफ, फैज इनामदार, मुफ्ती सद्दाम रहमानी यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. यापुढेही शैक्षणिक, कौशल्यविकास व करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगण्यात आले.


