मिरज सिव्हिलच्या स्वागत कमान प्रकरणी चौकशीची मागणी
मागणी नसतानाही मंजुरी कशी ? अधिष्ठात्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करा – डॉ. महेशकुमार कांबळे
मिरज (प्रतिनिधी)
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्वागत कमान दुर्घटनेप्रकरणी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालय प्रशासनाने स्वागत कमानीची मागणी केलेली नसतानाही कामाला मंजुरी कशी मिळाली, याची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
काही दिवसांपूर्वी स्वागत कमान कोसळून कामगार जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर कमानीच्या मंजुरीपासून बांधकामापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया तपासण्याची मागणी कांबळे यांनी केली. १६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात विविध दुरुस्तीच्या कामांचा उल्लेख आहे; मात्र स्वागत कमान उभारण्याचा प्रस्ताव नसल्याचा दावा कांबळे यांनी केला.
कमान बांधकामासाठी तांत्रिक मंजुरी कोणत्या आधारावर देण्यात आली, निविदा प्रक्रिया कशी झाली, स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का, निधीचा वापर कसा झाला आणि कामाचा दर्जा तपासला होता का, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, सहाय्यक कामगार आयुक्त येळगुंडे आणि रिलायंट बिल्डअपचे कंत्राटदार संजय खराडे यांची भूमिका तपासून दोष आढळल्यास गुन्हे दाखल करावेत, असे कांबळे यांनी सांगितले.
तसेच आर्थिक व्यवहार व कथित टक्केवारीबाबतही त्यांनी आरोप केले. एका मंत्र्यांच्या पी.ए.चा सहभाग असल्याचा आरोप करत, संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगामी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मिरज सिव्हिलमधील कथित अनियमिततांबाबत कागदपत्रे व पुरावे सादर करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधितांकडून या आरोपांवर अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.


