गारगोटीसह परिसरात विजेच्या गडगडाटात मुसळ“धार“ पावसाची हजेरी
खरीप पिकांना दिलासा-बळीराजा सुखावला
गारगोटी ता. 30 (आनंद चव्हाण )
भुदरगड तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारी गारगोटी व परिसरात जोरदार हजेरी लावली.ढगांच्या गडगडाटात सुमारे दिड तास झालेल्या मुसळधार पावसाने आज सर्वत्र पाणीच पाणी केले आणि हवेत गारवा निर्माण केला.आज बुधवार गारगोटी आठवडी बाजारात व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली.या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात भुदरगड तालुका वसला असून या तालुक्यात विशेषतः पाटगाव, कडगाव भागात पर्जन्यमान जास्त आहे. दरवर्षी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, पण यंदा या तालुक्यात उशिराने सुरुवात केली, आणि सप्टेंबर महिन्यात तो कमी प्रमाणात झाला. गेल्या पंधरा वीस दिवसांत तर पावसाने दडी मारली होती, त्यामुळे काढणी आलेल्या भात, भुईमूग, सोयाबीन शिवाय कडधान्य ही खरीप पिके अडचणीत आली होती, पाण्याची सोय नसलेल्या माळ रानावरील या पिकांनी मान टाकली होती, त्यामुळे या पिकांना पावसाची गरज होती. कांही ठिकाणी पाण्याची सोय असलेल्या शेतीला बळीराजाने कृषी पंपाने पाणी दिले. त्यामुळे त्या शेतातील पिके तग धरून आहेत. आज झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.तर ऊस शेतीला पिकाच्या वाढीसाठी हा पाऊस आवश्यक आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
गारगोटी आठवडी बाजारात उडाली तारांबळ
दर बुधवार गारगोटीचा आठवडी बाजार भरतो.गेल्या पंधरा वीस दिवसांत पाऊस नसल्याने व्यापाऱ्यांनी पावसापासून बचावासाठी आपल्या भाजीपाला व इतर वस्तूवर प्लास्टिक कागद बांधला नव्हता, शिवाय ग्राहकांनी सुद्धा घरातून छत्री, रेनकोट बाजारात बरोबर नेले नव्हते.दुपारी तीनच्या दरम्यान ढग दाटून मुसळधार पाऊस सुरु झाला, त्यामुळे आपल्या भाजीपाला व मालाच्या पावसापासून बचावासाठी धावाधाव उडाली. तर ग्राहकांना सुद्धा दुकाने, पत्र्याचे शेडखाली आसरा घ्यावा लागला.अनेकांनी भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर मांडला होती, जोरदार पावसाने काहींचा टोमॅटो, भाजीपाला पावसात वाहून गेला.
गडहिंग्लज-गारगोटी रस्त्यावर पाणीच पाणी
गेल्या कांही दिवसापासून भुदरगड तालुक्यात पावसाने दडी मारली होती, शिवाय गेल्या आठ पंधरा दिवसापासून कडक ऊन पडत होते. त्यामुळे ऐन सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर हिट जाणवत होती. आणि आज दुपारी विजेच्या कडकडाटात अचानक परतीच्या पावसाने सुरुवात केली, सुमारे तास दिड तासभर झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणीच पाणी झाले, गारगोटी ते गडहिंग्लज राज्य मार्गावर इंजूबाई मंदिराजवळ रस्त्यावरून सुमारे गुडघाभर पाणी वाहत होते.त्यातूनच या मार्गांवरील वाहतूक संथपणे सुरु होती.शिवाय या पावसामुळे या रस्त्यावरील पाणी शेजारील दुकानात, हॉटेलात घुसले.
रस्त्यावरील ओढ्याचे पात्र बंद-पाणी दुकानात घुसले
गारगोटी गडहिंग्लज मार्गावर इंजूबाई मंदिराशेजारी एक ओढा होता, शिवाय गेल्या वीस वर्षापूर्वी याच ओढ्यावर पूल होता. गेल्या दहा वर्षात या मार्गांवरील पूल व ओढ्याचे पात्र बंद केले आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसात गुडघाभर पाणी साचते, आणि आजच्या मुसळधार पावसामुळे शेजारील दुकान, हॉटेल, फर्निचर दुकानात घुसले, त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. शिवाय या दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली. या मार्गांवरील अनेक ठिकाणी असे ओढे, नाले यांचे अस्तित्वच नष्ट केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या कारभारावर नाराजी आणि संताप व्यक्त होत होता.
=


