स्नेहालय सांगलीचा ‘आरोग्यदान’चा अनोखा उपक्रम
मिरज (प्रतिनिधी)
महिला सबलीकरण, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्नेहालय, सांगलीच्यावतीने महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. स्नेहालयचे अध्यक्ष धनंजय आरवाडे यांच्या संकल्पनेतून २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘स्नेह मोफत सॅनिटरी पॅड सेंटर’च्या माध्यमातून झोपडपट्टी भागातील ४०० हून अधिक महिला तसेच अनाथाश्रमातील मुलींना दर महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जात आहेत.
या उपक्रमांतर्गत श्यामनगर कुपवाड येथे नव्या सॅनिटरी पॅड सेंटरची सुरुवात करण्यात आली. यावेळी एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या गरजू महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी स्नेहालयचे अध्यक्ष धनंजय आरवाडे, उपाध्यक्षा डॉ. ज्योती आदाटे, सचिव प्रा. राणी यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते जीवन आदाटे, मनीषा सूर्यवंशी, नीलम साळुंखे उपस्थित होत्या. कोरोना काळात विविध रुग्णालयांमध्ये सेवा देताना महिलांच्या मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत अनेक समस्या स्नेहालयच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्या. आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यविषयक माहितीच्या अभावामुळे काही महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आढळून आले.
यातूनच महिलांना मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासोबतच महिलांना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था आणि दात्यांचे सहकार्य मिळत आहे. मात्र, वाढती गरज लक्षात घेता, आणखी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेहालयच्यावतीने करण्यात आले आहे. स्नेहालयच्या या ‘आरोग्यदान’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


