न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची आंबा वनपरिक्षेत्रास भेट
वन्यजीव सप्ताहानिमित्त
मलकापूर (प्रतिनिधी): वन्यजीव सप्ताह निमित्त न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी आंबा वनपरिक्षेत्रातील निसर्ग माहिती केंद्र, आंबा येथे भेट देऊन वन्यजीव व निसर्ग संवर्धनाबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील विविध वन्यजीव, पशुपक्षी, वनस्पती तसेच जैवविविधता आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी निसर्ग पर्यटन ट्रेकचे आयोजन करून जंगलातील विविध जैवविविधतेची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.
यावेळी आंबा सडा परिसरात प्लास्टिकमुक्ती अभियान राबवून विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा संकलित केला व पर्यावरण स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंबेश्वर देवराई येथे भेट देऊन परिसरातील नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाची माहिती घेतली.
निसर्ग माहिती केंद्र, आंबा येथील राजर्षी शाहू महाराज निसर्ग शिक्षण सभागृह आंबा येथे विद्यार्थ्यांना वन्यजीव, जैवविविधता व वनसंवर्धनाशी संबंधित विविध माहितीपट दाखविण्यात आले. या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव सहअस्तित्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक चांदोली श्रीमती अंकिता तरडे , वनपरिक्षेत्र अधिकारी आंबा प्रदीप कोकितकर, वनपाल सुरेश चरापले, राहुल पाटील, मनीषा देसाई, वनरक्षक सुभाष वसावे, रोहिदास पडवळे, कोमल मराठे, अंजली नवले तसेच वनसेवक उपस्थित होते. न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक अमोल कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले.
00000


