सिद्धगिरी’ मध्ये दुर्बीणीच्या सहाय्याने राज्यातील पहिली बायपास शस्त्रक्रिया

0
WhatsApp Image 2025-03-11 at 7.13.23 PM

कोल्हापूर ता.११ (प्रतिनिधी)

        सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यातील पहिली दुर्बीणीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. एका ६५ वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग व शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. सयाजीराव सरगर यांनी ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, हा रूग्ण दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता आणि एक दिवस आड डायलिसिस होता. हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया अत्यावश्यक बनली. सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग व शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. सयाजीराव सरगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही अत्यंत जटील शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले. दुर्बीनीच्या सहाय्याने इंटरनल मेमरी आर्टरी काढून, छातीच्या डाव्या बाजूस छोटा छेद देऊन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

डॉ. सयाजीराव सरगर म्हणाले, परंपरागत हृदय शस्त्रक्रियेत छातीच्या समोरील भागात मोठा छेद घेऊन स्टरनम नावाचे हाड कापून हृदयावर ऑपरेशन करावे लागते. ज्यामुळे रुग्णाला अधिक रक्तस्त्राव, वेदना आणि दीर्घकालीन विश्रांती आवश्यक असते. मात्र, दुर्बीणीच्या सहाय्याने बायपास सर्जरी केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव कमी होतो, वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. ही शस्त्रक्रिया केवळ तंत्रज्ञानाची नव्हे, तर सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कौशल्याची आणि सेवाभावी वृत्तीची साक्ष देणारी आहे. पत्रकार परीषदेस वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर, विवेक सिद्ध, कुमार चव्हाण, राजेंद्र शिंदे, अमित गावडे उपस्थित होते.

गरजू रूग्णांना संजिवनी

सिद्धगिरी हॉस्पिटल नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे. प्रगत उपचारपद्धती सामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या ध्येयाचा हा आणखी एक टप्पा आहे. ज्या रुग्णांना हृदयविकार व बायपास शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यासाठी अशा अत्याधुनिक प्रकारे केल्या जाणारया शास्त्रक्रिया संजिवनी ठरतील. अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी

                                  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *