सलगरेत माकडाचा सहा जणांना चावा ; वनविभागाच्या गाडीवर असूनही माकड पकडण्यास वनविभाग अपयशी

मिरज (प्रतिनिधी)
मिरज तालुक्यातील सलगरे येथे एका माकडाने दिवसभर धुमाकूळ घातला. या माकडाला पकडण्यास आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडाने पळ काढला मात्र वन विभागाला हे माकड पकडता आले नसल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सकाळी नेहरू चौकात एका व्यक्तीने या माकडास खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तींच्या गालाचे लचके तोडले यानंतर परिसरातील उभ्या असणाऱ्या मोटरसायकल पाडून हौदोस घातला.
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू झालेला हा पराक्रम दुपारी दोन वाजले तरी सुरूच होता. यादरम्यान अन्य ५ व्यक्तींना या माकडाने दिवसभरात जावा घेत जखमी केले. एक-दोन दिवसापासून हे माकड या परिसरामध्ये नव्याने आढळून आले आहे. मात्र आज अचानकपणे या माकडाच्या स्वभावात बदल घडला. गावातील अनेक मोटरसायकली या माकडाने पाडल्या. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच आज शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे पथक या ठिकाणी माकडाला जेरबंद करण्यासाठी हजर झाले. माकडाचा हा हैदोस पाहून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने आधीच बंद केली होती. मात्र उर्वरित दुकानातही हे माकड जात असल्याने अखेर ग्रामपंचायतच्या ध्वनीक्षेपकावरून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यासंदर्भात आव्हान केले गेले. व्यापारांनी दुकाने बंद केल्यानंतर पुन्हा या माकडाला पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र हे माकड सहजासहजी हाताला आले नाही. या पथकाकडे केवळ छोट्या दोन जाळ्या असल्याने या माकडाला पकडणे मोठे आव्हान बनले होते.
नेहरू चौकामध्ये वनविभागाच्या गाडीवरच जात या माकडाने आपले धाडस सर्व नागरिकांच्या समक्ष वन कर्मचाऱ्यांना दाखवले. यानंतर मात्र या माकडाने सर्व गावातून धुमाकूळ घालत अखेरीस ग्रामपंचायती शेजारील हनुमान मंदिराच्या दारात असलेल्या झाडावर मुक्काम ठोकत ग्रामस्थांना व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला. तास दोन तास झाडाखाली वनविभागाचे कर्मचारी वाट पाहून अखेर हताशपणे निघून गेले. अगदी समोरच असून देखील माकड पकडण्यात अपयश ठरलेल्या वनविभागाचे कर्मचारी चौकात असतानाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.