मिरजेत ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत ३० दिवसीय मेन्स सलून प्रशिक्षण

मिरज (प्रतिनिधी)
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली व बी. ओ. आय. स्टार सांगली आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर रोड, डॉ. बापुजी साळुंखे कॉलजच्या पाठीमागे, रमा उद्यान शेजारी, मिरज येथे ३० दिवस मोफत “मेन्स पार्लर/सलून ” प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील युवक युवतींना एक कुशल उद्योजक बनवण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे उद्घाटन नुकतेच झाले असून या कार्यक्रमासाठी जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ, आरसेटी संचालक महेश पाटील, प्रशिक्षिका सौ. कोमल दबडे उपस्थित होते.
या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींचे उत्पन्न वाढावे, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांना बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून “मेन्स पार्लर/सलून” चे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये मेन्स पार्लर सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकासह शिकवला जात आहे तसेच व्यक्तिमत्त्व विकास, उत्तम संभाषण कौशल्य, उद्योजकीय सक्षमता, बँकेचे व्यवहार, विविध शासकीय योजने बाबत माहिती आणि मार्गदर्शन केले जात आहे. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन बी. ओ. आय. स्टार सांगली आरसेटी चे प्रशिक्षक प्रदीप साळुंखे व प्रवीण पाटील सर यांनी केले. तसेच आरसेटीचे निदेशक महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.