मिरजेतील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर रुग्णालयाचे रविवारी उदघाटन

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
येथील ४५ डॉक्टरांनी एकत्र येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे हॉस्पिटल उभारले आहे. उद्या रविवारी दिनांक ६ एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, खासदार विशाल पाटील, आयुष्मान भारत योजनेच्या राज्य समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे, आ. इद्रिस नायकवडी, आ. सुधीर गाडगीळ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे.
हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. दिलीप टकले, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शिरीष चव्हाण, पेट्रन डॉ. शिशिर गोसावी, डेप्युटी डायरेक्टर डॉ. शबाना मुजावर, सानिका प्राणी यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. सोमशेखर पाटील, मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ. रियाज मुजावर, डॉ. सुरज तांबोळी, डॉ. योगेश जमगे, डॉ. गौरव फले, डॉ. सुधीर कदम, डॉ. साबेरा तांबोळी, मंजुषा चव्हाण, डॉ. अभिमान पवार यांच्यासह मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
संस्थेचे सीईओ डॉ. चव्हाण यांनी माहिती दिली की, रविवार सकाळी ११ वाजता मिरजेतील बुधगावकर मळा, गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज जवळील हॉस्पिटलच्या प्रांगणात कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी सर्वच विभागांमध्ये उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व आधुनिक उपचारांसाठी आवश्यक जागतिक दर्जाची यंत्रे आणि साधने उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार रुग्णाला याठिकाणी त्याचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून येथे रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. हॉस्पिटल सुरू केल्यानंतर एनएबीएच मानांकनासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. भविष्यात येथे वैद्यकीय, पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
रुग्णालयात क्रिटिकल केअर मेडिसिन, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी, Otorhinolaryngology (कानाच्या स्नायूंच्या शस्त्रक्रिया), गॅस्ट्रोइंटेरोलॉजी, युरोलॉजी, पॅथॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गायनॅकॉलॉजी, पेडियाट्रिक्स, Rheumatology (संधिवातशास्त्र), रेडिओलॉजी, पलमोनरी मेडिसिन आदी विभाग या ठिकाणी असणार आहेत. १५० बेड, ६० बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, अतिदक्षता विभागात २४ तास इंटेन्सीव्हीस्ट नियुक्त, २४ तास इमर्जन्सी आणि ट्रॉमा केअर सेवा, कॅथलॅब व तज्ञांची टीम, डायलेसिस व नेफ्रॉलॉजी टीम, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, सिटीस्कॅन, युएसजी, एक्स-रे, लॅबोरेटरी या तांत्रिक सुविधांसह ज्येष्ठ अनुभवी अशा डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार होणार आहेत.