मिरजेत सराफाला लुबाडणारी महिला जेरबंद ; शहर पोलिसांची कारवाई

सांगली (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
मिरजेतील सराफी दुकानात दागिने खरेदीच्या पाहण्याने येऊन दुकानातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दुकानात आलेल्या पाच महिलांसह एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत यापैकी एका महिलेस जेर बंद करण्यात यश मिळवले आहे. चोरी करण्यात आलेल्या ८० ग्राम वजनाच्या सोन्या पैकी ५३.५ ग्राम वजनाचे सोने पोलिसांनी सदर महिलेकडून हस्तगत केले आहे. राणी अजय गायकवाड (वय ३२, रा. रामवाडी, सलगर वस्ती, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२७ मार्च रोजी मिरजेतील बद्रीनारायण बळवंत कट्टी यांच्या सराफी दुकानात पाच बुरखादारी महिला व एक पुरुष सोने खरेदीच्या बहाण्याने आले होते. सराफ कट्टी यांची नजर चुकवून दुकानातील सुमारे ४ लाख रुपये किमतीचे ८० ग्राम वजनाचे रिंगा व बाली असे ३५ नग दागिने चोरून नेले होते. या घटनेनंतर सराफ कट्टी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या पथकाने तपास केला.
अशा प्रकारचे गुन्हे करणारे अभिलेखावरील आरोपी तपासून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. दिनांक २ रोजी याप्रकरणी सदर महिलेस अटक करून तिच्याकडे तपास केला असता चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ५३.५ ग्रॅम वजनाचे २९ दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी राणी गायकवाड या महिलेस अटक केली असून या प्रकरणातील मधुमती धर्मराज गायकवाड, राजू उर्फ काण्या अंबादास गायकवाड, लक्ष्मी दीपक शिवशरण अशी अन्य आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.