निरोगी आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा अधिकार – न्यायाधीश व्ही. व्ही. खुळपे

0
IMG-20250407-WA0016

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, मिरज येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात

मिरज (प्रतिनिधी)
निरोगी आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या अति वेगवान जीवनशैलीमुळे आरोग्याकडेच नेमके दुर्लक्ष होते. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत, स्वतःच्या उत्तम फिटनेसबाबत, मानसिक आरोग्याबाबत जागरुकता वाढावी, यासाठीच जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो, असे मत मिरजेतील कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश व्ही. व्ही. खुळपे यांनी व्यक्त केले.

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती, मिरज आणि वकील बार संघटना मिरज यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, मिरज येथे कायदेविषयक शिबीर आयोजित केले होते. याप्रसंगी श्री व्ही. व्ही. खुळपे बोलत होते. यावेळी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ या विषयावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय, मिरज येथील स्त्रीरोग शास्त्र विभागातील डॉ. श्रीकांत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ॲड. अजिंक्य कुलकर्णी यांनी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे परंतु वंशाची पणती नकोशी झाली असल्याचे मत व्यक्त केले.

हा कायदा स्त्री-भ्रूणहत्या आणि लिंग गुणोत्तरातील असमानता रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या कायद्यामुळे गर्भलिंग निदान आणि लिंग निवडीसाठी गर्भपात यांवर निर्बंध आले आहेत, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत आहेत असेही मत त्यांनी व्यक्त केले. या कायद्याशी संबंधित असणाऱ्या कायदेशीर तरतूदींची माहितीही त्यांनी दिली. यावेळी वकील बार संघटना अध्यक्ष ॲड. मोहन खोत, ॲड. प्रसाद खटावकर, डॉ.संजय माने, वंदना शहाणे, संजय खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सुर्यप्रकाश राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियंका राठी, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, विद्यार्थी, रूग्ण व त्यांचे नातेवाईक मोठया संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *