रोझावाडी येथील चंद- पाणंद रस्ता तहसीलदार यांनी केला शेतकऱ्यांसाठी खुला

0
WhatsApp Image 2025-04-11 at 10.22.46 PM

तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या निर्णयाने आष्टा, दुधगाव, बागणी, रोझावाडीतील शेतकऱ्यांना होणार लाभ

आष्टा प्रतिनिधी:डॉ तानाजी टकले

रोझावाडी येथील गेली कित्येक वर्ष चंद पाणंद हा वादग्रस्त असलेला रस्ता जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावत शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.या त्यांच्या कामगिरीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

येथील गट नंबर २७/१ या जमिनीतील गट नंबर २७/३ च्या पूर्व बाजूने व गट क्रमांक २७/१ च्या पश्चिम बाजूंनी सर बांधावरून रस्त्याची मागणी केली होती. यातील अर्जदार मोहन हरिबा चंद व विरुद्ध सिताराम गुंडा माळी, विकास सिताराम माळी, सचिन शिवाजी मोरे या दोन्ही बाजूच्या लोकांना नोटीसा पाठवून म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली. याकामी १६ सुनावण्या झाल्या होत्या. पाच वर्ष हा विषय प्रलंबित होता. तत्कालीन कोरेगावचे मंडल अधिकारी, रोझावाडी तलाठी यांनी पंचनामा व जबाब नोंदवून अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला होता. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा व जबाब अहवाल तयार केला होता. मागील सर्व गोष्टींचा अभ्यास करून व सर्व बाजूंचा विचार करून तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला केला. रोझावाडी, दुधगाव, बागणी, आष्टा या गावांना जोडणारा हा रस्ता शेतकरी वर्गासाठी उपयुक्त ठरणार आहे. या क्षेत्रात बागायती ऊस व अन्य पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतकऱ्यांचा भाजीपाला वेळेत बाजारपेठेत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना या रस्त्याचा मोठा उपयोग होणार आहे.

तहसीलदार लिंबारे म्हणाले, शासनाच्या नियमानुसार रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले करण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमचे आहे. कोणावरही अन्याय न होता अशा प्रकारचे रस्ते सर्वांसाठी खुले होणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी देखील आडमुठे पणाचे धोरण न घेता भविष्यातील सर्वांचीच गरज ओळखून बांधावरील रस्त्यांचे वाद लवकरात लवकर संपुष्टात आनावेत. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी आष्टा तहसील कार्यालय तत्पर असेल असे ते यावेळी म्हणाले. यावेळी सर्कल विजय तोडकर, रोझावाडी सरपंच जुबेर पिरजादे, बागणी उपसरपंच संतोष घनवट, कोतवाल रणजीत भोई यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *