उठा, जागे व्हा, उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका’ ही विवेकानंदांची शिकवण अंगी रुजवा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी युवकांना दिला यशस्वी जीवनाचा मूलमंत्र
कोल्हापूर, ता .12 (प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे पार पडला.
युवक ही आपल्या देशाची शक्ती असून मजेत जीवन जगताना ध्येय निश्चित करा.. व्यसनांपासून दूर रहा. स्क्रीन टाईम हा बुक टाईम, ग्राउंड टाईम आणि स्टडी टाईम बनवा.. अधिकाधिक ज्ञान मिळवा. खडतर परिश्रम घेऊन उत्तम करिअर घडवा आणि यशस्वी होऊन आपल्या जिल्ह्याचे नाव जगभरात उज्वल करा, अशा शब्दांत यशस्वी जीवनाचा मूलमंत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी युवकांना दिला.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, देशाचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. युवा दशेत खडतर परिश्रम घेतलेल्या अनेक व्यक्तींनी देशाचे नेतृत्व केले आहे तर बिरदेव डोणे यांच्यासारख्या युवकांनी ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून भरघोस यश मिळवले आहे. ‘उठा, जागे व्हा, उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका’ ही शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी चौफेर व्यक्तिमत्व घडवावे. विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियानाच्या माध्यमातून व बार्टी, महाज्योती, सारथी अशा संस्थांमार्फत शासकीय योजनांचा लाभ घेऊन विकास साधा. विविध भागांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढत असतानाही आपले महाविद्यालय व महाविद्यालयाचा परिसर अंमली पदार्थ मुक्त व तंबाखू मुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, महाविद्यालयीन जीवन मजेत जगताना व्यक्तिमत्वाचा विकास घडवा. मोठे स्वप्न बघा. ध्येय निश्चित करा. ते पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम घ्या. चांगले मित्र जोडा. व्यसनांपासून दूर राहण्याचं आव्हान स्वीकारा. शिस्तीचे पालन करा. सकारात्मक रहा. अधिकाधिक ज्ञान ग्रहण करा. यशस्वी होऊन आई, वडील, जिल्हा, राज्य व देशाचे नाव उंचवा, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले.