वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावर्डे-मांगले बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली

बोरपाडळे (श्रीकांत कुंभार)
वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शिरोळ तालुक्यातील बच्चे सावर्डे-मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सलग तिसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर-सांगली दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मे महिन्यापासून अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनच्या दमदार सरींमुळे छोटे-मोठे ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर गेली असून नदीकाठच्या शेतजमिनी, पिके व मळे मोठ्या प्रमाणात जलमय झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वारणा नदीवरील वाढलेला विसर्ग व पाणीपातळी यामुळे आज पुन्हा एकदा सावर्डे-मांगले बंधारा पूर्णतः पाण्याखाली गेला. परिणामी स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले असून नदीपात्राला लागून असणाऱ्या गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बंधाऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.