एकादशी निमित्त हनुमान सेवा संस्थेच्या वतीने कुडित्रे ते पंढरपूर अशी बस सेवा

बुधवारी एकादशीच्या दिवशी कुडित्रे- पंढरपूर भक्ती शक्ती एसटी बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष महादेव माळी व पंढरपूरला जाणारे भक्त..
कोपार्डे (प्रतिनिधी) येथील हनुमान सेवा संस्थेच्या वतीने एकादशीच्या दिवशी कुडित्रे-पंढरपूर अशी भक्ती शक्ती एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष महादेव माळी यांनी दिली.यावेळी उपाध्यक्ष महादेव पाटील उपस्थित होते.बुधवारी या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्ष महादेव माळी म्हणाले कुंभी कासारी कारखाना परिसरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी आहे. यात तरुणांबरोबर महिला व वृध्दाची संख्या मोठी आहे. पण पंढरपूरला जाण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात जाणे कठीण होत चालले आहे. यासाठी अनेक लोकांनी तशी विनंती केल्याने बुधवारी एकादशी दिवशी ही कुडित्रे ते पंढरपूर थेट बस एसटी सेवा सुरू करून विठ्ठल भक्तांची सोय करण्यात आली आहे. दर महिन्याला एकदशी दिवशी कुडित्रे पंढरपूर थेट एसटी बस सेवा सुरू राहणार आहे. महिलांच्या साठी अर्धे तिकीट तर ७५ वर्षावरील वृध्दांना शासनाच्या नियमांने मोफत प्रवास सेवेचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले.दर महिन्याला ही एसटी बस सेवा सुरू राहणार आहे असल्याने पंढरपूरला एकादशीला जाणाऱ्या कुडित्रे पंचक्रोशीतील विठ्ठल भक्तांनी हनुमान सेवा संस्थेशी संपर्क साधावा असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ संचालक डी.एन.कुलकर्णी यांच्या हस्ते या सेवेचा कुडित्रे येथून बुधवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी संचालक आनंदराव पाटील,पांडुरंग पाटील (माजगावकर), अशोक पाटील,अजित पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.