भोगावती कारखाना अनुत्पादक मालमत्ता विक्रीस विरोध

भोगावती साखर कारखान्याची अनुत्पादक मालमत्ता विक्री करण्यास विरोधी शिवशाहू आघाडीचा विरोध
हळदी. (प्रतिनिधी) भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने कारखान्याची अनुत्पादक मालमत्ता विक्री करण्याचे ठरवले असून, वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी याला जोरदार विरोध करावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी केले. कुरुकली (ता. करवीर) येथे आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
हंबीरराव पाटील म्हणाले, “सध्या भोगावतीचा प्रति टन उत्पादन खर्च २६०० रुपये आहे, तर प्रति टनासाठी १०९२ रुपयांचा व्याजाचा भार सोसावा लागत आहे. कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी विरोधी आघाडी सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु त्याचबरोबर गैरकारभाराची शासनामार्फत चौकशी केली जाईल.” या वर्षी कारखान्याला ७० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगून, वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अजित पाटील परितेकर यांनीही कारखान्याच्या कारभारावर टीका केली. “भोगावतीत अयोग्य कारभार सुरू आहे. नवीन संचालक मंडळाकडे कर्जमुक्तीचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळे कारखान्यावरील कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे. या विरोधात वार्षिक सभेत आवाज उठवला जाईल,” असे ते म्हणाले. त्यांनी भोगावती शिक्षण मंडळातही जुन्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला.
या बैठकीला भोगावतीचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील, मोहन धुंदरे, एम.आर.पाटील (कोथळी), राजू पाटील (हसुर), निवास पाटील (हळदी), बी वाय लांबोरे (बेले), मोहन पाटील (कोथळी), तानाजी जाधव (बाचणी), धीरज करलकर, सुभाष जाधव, अण्णाप्पा चौगले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.