भाषिक द्वेष हा भाषिक विकासातील अडसर – डॉ. अर्जुन चव्हाण

रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छ. शाहू कॉलेज, कदमवाडी येथे शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना…
कोल्हापूर (प्रतिनिधी) मानवी विकासातील भाषेचे महत्त्व खूप आहे. पण अलिकडे टोकदार झालेल्या भाषिक अस्मिता आणि त्यामागील राजकारण यामुळे मानव म्हणून आपल्या होणाऱ्या भाषिक विकासासाठी भाषिक द्वेष अडसर ठरू लागला आहे. असे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कदमवाडी येथील राजर्षी छ. शाहू कॉलेजच्या हिंदी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते.
व्यक्ती म्हणून आपण सर्व भाषा अभ्यासल्या पाहिजेत. आपले बहुभाषिक असणे हे आपल्या बौद्धिकतेचे खूप मोठे लक्षण आहे. एका पेक्षा अधिक भाषा अवगत असल्याने आपले व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न होण्यास सहाय्यभूत ठरतात. त्यामुळे भाषिक द्वेषापासून अलिप्त राहून आपण आपला विकास साधूयात. असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, प्रो. डॉ. डी. आर. भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात हिंदी भाषेतील रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधींच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. याप्रसंगी हिंदी विभागाच्या वतीने साहित्य सौरभ ह्या विशेष भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. ए. पी. उबाळे, आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके, हिंदी विभागाचे प्रा. ए. एस. पाटील व महाविद्यालयाच्या सिनिअर व ज्युविभागाचे विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत कॅप्टन डॉ. आर. सी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कु. स्नेहल आगलावे व कु. तेजस्विनी पाटील हिने तर आभारप्रदर्शन कु. अंकिता सोनवले हिने केले. ह्या कार्यक्रमास विविध विषयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.