जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) ॲपेक्सतर्फे पूरग्रस्तांसाठी दोन कोटी

पृथ्वीराज कोठारी, ललित गांधी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द
कोल्हापूर. (प्रतिनिधी) सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) ने राज्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपयांचे भरीव योगदान दिले. जितो अपेक्सचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन कोटीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी जितोचे माजी अध्यक्ष सुखराज नहार, मनोज मेहता, बिपिन भाई दोशी, संजय डांगी, संदीप भंडारी, ॲड. मेघ गांधी, विकास अच्छा आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जितोच्या या उदार योगदानाबद्दल आभार व्यक्त करत म्हणाले की, “राज्यात किंवा देशात कोणत्याही प्रकारच्या आपत्तीच्या काळात समाजहितासाठी तत्परतेने पुढे येणारी जितो ही संस्था केवळ व्यावसायिक संघटना नसून एक सामाजिक चळवळ आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेले हे योगदान प्रेरणादायी आहे.”
जितोचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणाले, “समाज आणि राष्ट्रसेवा ही आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात देणे हे आमचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यासाठी आम्हाला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.”
जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पृथ्वीराज कोठारी आणि सुखराज नहार यांच्या उपस्थितीत महामंडळ व जितो यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व आर्थिक विकास प्रकल्पांबाबतही चर्चा केली.