स्व. राहुल पाटील यांची ‘प्रवेश’ कादंबरी समाजाचे डोळे उघडणारी – दि.बा.पाटील

0
WhatsApp Image 2025-10-13 at 11.10.27 AM

स्व.राहुल पाटील यांच्या ‘प्रवेश’ कादंबरीचे सांगलीत प्रकाशन

मिरज (प्रतिनिधी)

लेखकाला आत्मभान आणि समाजभान असावे लागते, चांगला लेखक हा चांगला माणूस असावा लागतो. स्व. राहुल पाटील यांच्या ठायी ह्या गोष्टी होत्या त्यामुळेच त्यांची ‘प्रवेश ‘ ही लघु कादंबरी सर्वार्थाने उत्तम साहित्यकृती झाली आहे. ही कादंबरी शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडणारी आहे. ती समाजाचे डोळे उघडणारी व परिवर्तनाचा संदेश देणारी महत्वाची कादंबरी आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी केले. सांगली येथील कवी -लेखक स्व. राहुल पाटील यांच्या ‘ प्रवेश ‘ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

यावेळी मंचावर ज्येष्ठ साहित्यिक विजय जंगम, ऍड.कृष्णा पाटील, सुधाकर इनामदार, दीपा पाटील, धैर्यशील राहुल पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक विजय जंगम यांनी ‘प्रवेश’ या लघुकादंबरीतील मर्मस्थाने आणि समकालीन वास्तव या अनुषंगाने आपल्या मनोगतात कादंबरीवर भाष्य केले तर साहित्यिक ऍड. कृष्णा पाटील यांनी कादंबरीतील व्यक्तिरेखा यावर आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी धैर्यशील राहुल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रा. संतोष काळे यांनी केले. कवी गजानन पाटील यांनी स्वागत केले. साहित्यिक आनंदहरी यांनी प्रास्ताविक केले तर कवयित्री जस्मिन शेख यांनी आभार मानले. याप्रसंगी मनीषा रायजादे, सुहास पंडित, दयासागर बन्ने, मेहबूब जमादार, आनंदराव जाधव, दिलीप गिरीगोसावी, विक्रम जाधव, दादासाहेब जगदाळे, रावसाहेब यादव, अमृता पवार, मुबारक उमराणी, गौतम कांबळे, प्रतिभा पोरे, निर्मला लोंढे, शांता वडेर इ. साहित्य क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. तिळगंगा साहित्यरंग परिवार(पेठ), आम्ही सिद्धलेखिका (सांगली), शब्दगंधर्व साहित्य परिवार(जत), काव्यप्रेमी शिक्षक मंच(सांगली), राहुल पाटील कवी कट्टा (सांगली) या साहित्य चळवळीत कार्यरत असणाऱ्या संस्थांनी प्रकाशन समारंभाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *