आवटींनंतर बागवान यांचाही नवा पक्ष ; मिरज पॅटर्नचा दुसरा धक्का
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत भाजपचे नेते सुरेश आवटी यांनी त्यांच्या स्वतंत्र पक्ष नोंदणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे प्रकटन वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली असतानाच आता मिरजेतील दुसरे मातब्बर नेते, माजी महापौर मैनुद्दीन बागवान हे सुद्धा त्यांचा स्वतंत्र पक्ष नोंदणी करत असल्याचे समोर आले आहे. त्याबाबतचे प्रकटन वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या राजकीय वर्तुळाला मिरज पॅटर्नने दुसरा धक्का दिला आहे.
आवटी यांच्या नंतर बागवान यांनीही नव्या पक्षाच्या नोंदणीतून स्वतंत्र राजकीय पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने निवडणुकीतील त्यांच्या राजकीय भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. मिरज शहर स्वाभिमानी आघाडी या नावाने त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणीसाठी अर्ज केला आहे. माजी महापौर मैनुद्दीन बागवान हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. असिफ शेख हे सचिव तर चंद्रकांत हुलवान हे कोषाध्यक्ष आहेत.
मिरजेत महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये मैनुद्दीन बागवान यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गत महापालिकेच्या निवडणुकीत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटील गटाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. मैनुद्दीन बागवान हे स्वतः माजी मंत्री जयंत पाटील यांचे निष्ठावंत समर्थक समजले जातात. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार विशाल पाटील यांचे उघडपणे समर्थन केले. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतंत्र पक्ष नोंदणीसाठी प्रयत्न सुरू केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


