मिरज विवाह नोंदणी विभाग सांगलीला हलविण्याच्या हालचालीस ‘जिजाऊ’ संस्थेचा विरोध
मिरज (प्रतिनिधी)
मिरज महापालिका विभागातील विवाह नोंदणी विभाग बंद करून तो सांगलीला हलविण्याच्या सुरू असलेल्या हालचालीस तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला आहे. विवाह नोंदणी विभाग मिरजमध्येच रहावा, या मागणीसाठी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्यावतीने धनंजय भिसे यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन दिले. सदरचा विभाग सांगलीला हलवल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात भिसे यांनी म्हटले आहे की, मिरज शहरात कार्यरत विवाह नोंदणी कार्यालयामुळे विवाह झालेल्या जोडप्यांना आपल्या विवाहाची नोंदणी करणे सुलभ झाले आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा उपयोग भावी आयुष्यात विविध कायदेशीर आणि शासकीय कामांसाठी होतो.
मात्र, हे कार्यालय सांगलीला स्थलांतरित करण्यात येणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रे व सामाजिक माध्यमांवर झळकत असून, असा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरेल.
सदर विभाग सांगलीला हलवल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने असा निर्णय घेऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, विवाह नोंदणी विभाग सांगलीला हलविण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्यावतीने देण्यात आला आहे.


