पहिल्याचं सौद्यात बेदाण्याला उच्चांकी ४१० रु दर ; दरवाढीमुळे व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये समाधान
सांगली (प्रतिनिधी)
वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीनंतर झालेल्या सांगली बेदाणा सौद्यांमध्ये तेरा दुकानांमधून तब्बल ११,००० बॉक्सची आवक झाली. या सौद्यांमध्ये प्रति किलो ४१० रुपये इतका उच्चांकी दर नोंदवला गेला. सुरुवातीच्या सौद्यांमध्येच २५ ते ३० रुपयांची बाजारवाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीतच बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी केले.
प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी आणि शून्य पेमेंट प्रणालीमुळे सांगली, तासगाव आणि पंढरपूर येथील बेदाणा सौदे काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. चालू वर्षी बेदाण्याचे भाव वाढल्याने कोट्यवधी रुपयांचे येणे-देणे थकले होते. मात्र, बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंटची काटेकोर अंमलबजावणी केल्याने दहा ते अकरा व्यापाऱ्यांवरच बेदाणा सौद्यांमध्ये बंदी घालण्यात आली असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
शुक्रवारी झालेल्या सांगली बेदाणा सौद्यामध्ये तेरा दुकानांमध्ये 16 गाडी आवक होती. त्यावेळी झालेल्या सौदा मध्ये हिरवा बेदाणा 360 ते 410 ,मध्यम कॉलिटी हिरवा बेदाणा 250ते 350 तर काळा 140 ते 160, पिवळा बेदाणा 300 ते 390 इतका उच्चाकी भाव मिळाला. दिवाळीपूर्वीच्या तुलनेत आता दरात २५ ते ३० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. चालू वर्षी अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे बेदाण्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून पुढील वर्षीही दर उंच राहतील, असा अंदाज सचिव महेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
सांगली बाजार समितीमध्ये सभापती सुजयनाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हळद, गूळ आणि बेदाण्याचे सौदे सुरू आहेत. या वेळी सचिव महेश चव्हाण, कृष्णकुमार सारडा, विनायक हिंगमिरे, पवन चौगुले, सुनील हडदरे, विनोद गड्डे, अभिजीत पाटील, दिगंबर यादव, कृष्णा मर्दा, सिद्धार्थ पटेल, नितीन मर्दा, पंकज केसरी, वृषभ शेडबाळे, रवी हजारे, ओंकार पिपळे, प्रवीण यादवाडे, विनोद कबाडे, सुरेश बिराजदार, रवी पाटील, हिरन पटेल, हरीश पाटील, राजाभाई पटेल, शरद पाटील, आसकी सावकार, सुनील खोत, अजित पाटील, देवेंद्र करे, धनंजय पाटील, सचिन चौगुले, महेश नागराळ यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते.


