मुस्लिमांच्या धार्मिक मालमत्तांच्या नोंदणीचे आवाहन ; मदनी ट्रस्ट, सांगली जिल्हा वक्फ बोर्डाची संयुक्त बैठक
सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या मस्जिद, दर्गा, ईदगाह, खानका, कब्रस्तान आदी धार्मिक मालमत्तांची नोंदणी शासनाच्या ‘उमीद’ या ऑनलाईन पोर्टलवर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि सांगली जिल्हा वक्फ बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक घेण्यात आली.
‘उमीद’ हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल असून, या पोर्टलवर नोंदणी केल्यास संबंधित धार्मिक संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
या संदर्भात दि. २० नोव्हेंबर रोजी माळी गार्डन, सांगली येथे जिल्हा वक्फ बोर्डाच्या वतीने माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘उमीद’ पोर्टलवरील नोंदणीबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद यांनी दिली. आतापर्यंत केवळ २९ मालमत्तांची नोंदणी झालेली असून, सांगली जिल्ह्यात सुमारे २५० धार्मिक मालमत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर नोंदणी ही वक्फ कायदा २०२५ मधील कलम ३ (बी) नुसार करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा वक्फ अधिकारी अब्दुल रफिक आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियांन पठाण यांनी दिली. ‘उमीद’ पोर्टलवर नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२५ असून, या मुदतीनंतर नोंदणीसाठी संबंधितांना वक्फ ट्रायब्युनलकडे जावे लागणार आहे. नोंदणीसाठी चांदणी चौकातील जिल्हा वक्फ बोर्ड कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीस मौलाना अजहर, मौलाना जुबेर, हाजी मुबारक सनदी, आसिफ मुजावर, रमजान मुल्ला, सिकंदर जमादार, मौलाना साहिल, मौलाना कादिर पटवेगार तसेच नोंदणी बोर्डाचे तौसिफ नायकवडी उपस्थित होते.


