निखिल कलगुटगी हत्या प्रकरणातील आणखी ४ जण अटकेत ; सलीम पठाण, चेतन कलगुटगी सह अन्य दोघे गजाआड
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेत गणेश तलाव जवळ झालेल्या निखिल कलगुटगी खून प्रकरणी पोलिसांनी आणखी चौघांना अटक केली. यामुळे आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. सदर प्रकरणी परागंदा असलेल्या या चौघा आरोपींना लोणावळा (जि.पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले असून आणखी अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांनी सांगितले. सलीम गौस पठाण (वय ३७, राहणार मंगळवार पेठ मिरज), चेतन सुरेश कलगुटगी (वय २८, राहणार वडर गल्ली मिरज), विशाल बाजीराव शिरोळे (वय २४, राहणार मंगळवार पेठ, होळी कट्टा), सोहेल जमीर तांबोळी (वय २६, राहणार खणभाग, सांगली) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, मिरजेत निखिल कलगुटगीची जुन्या वादातून खून झाल्याची घटना घडली होती. मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. पोलिसांनी यापूर्वी तपास करून ९ जणांवर कारवाई केली आहे. त्यापैकी दोघे अल्पवयीन आहेत. मात्र या गुन्ह्यातील मुख्य संशयित अन्यसाथीदारांसोबत परागंदा झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांचे पथक परागंदा आरोपींचा शोध घेत होते.
दि. ७ नोव्हेंबर रोजी परागंदा आरोपी हे लोणावळा जि. पुणे येथे असल्याची माहिती पथकास मिळाली. पोलिसांच्या पथकाने दोन दिवस लोणावळा येथे आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर येथील आरोपींना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश मिळाले. पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, रणजीत तीप्पे, भैरवनाथ पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, हवालदार काझी, गवळी, नितीन मोरे, वाघमोडे, राहुल जाधव, पोलीस शिपाई स्वप्निल नायकोडे, दीपक परीट, सुरेश पवार, संदीप पाटील, अमित मोरे, श्रीकांत केंगार, सायबर शाखेकडील करण परदेशी, अभिजीत पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.


