खटावमध्ये शॉक सर्किटमुळे ऊसाला आग ; ४ एकर ऊस व अर्धा एकर मका जळून खाक
मिरज (प्रतिनिधी)
खटाव (ता. मिरज) येथे बाळू माने यांच्या शेतात रविवारी (दि.९) दुपारी सुमारे ३.३० च्या दरम्यान शॉक सर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे ३ ते ४ एकर ऊस पिक पूर्णतः जळून खाक झाला तर अर्धा एकर मका पिकही राख झाले. कर्नाटक सीमेजवळील विष्णूवाडी रोडलगत असलेल्या या शेतजमिनीमध्ये अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग वेगाने पसरली.
आग लागल्याची माहिती मिळताच गावातील तसेच शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे सुमारे एक एकर ऊस पिक व एक एकर मका पिक वाचवण्यात यश आले. आगीत दऱ्याप्पा पुंडलिक बाळूमाने (गट क्र. 327, ऊस), परशुराम पुंडलिक बाळूमाने (गट क्र. 327, ऊस), आप्पासो बाळूमाने (गट क्र. 324, ऊस) आणि दर्याप्पा महादेव बाळूमाने (गट क्र. 333, मका) या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदत मिळावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच आगग्रस्त ऊसाची लवकरात लवकर तोड करून कारखान्याला पाठविण्याबाबतही शेतकरी प्रशासनाकडे आग्रह धरत आहेत. शॉक सर्किटमुळे झालेल्या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.


