दिवाळीत तुमचे डिवाळे काढणाऱ्या प्रवृत्तीला परिवर्तन करून धडा शिकवा- निशिकांत भोसले-पाटील
दुधगाव येथे प्रचार सभा
इस्लामपूर : (प्रतिनिधी)
विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर कुठलीतरी माहिती पुस्तिका काढली आहे म्हणे. पण त्यांनी घरोघरी पोहच केलेल्या पुस्तिकावर खर्च करण्यापेक्षा दिवाळीत त्यांच्या साखर कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकाला १०० रुपयांचा बिलाचा हप्ता दिला असता तर त्यांची दिवाळी चांगली झाली असती. त्यामुळे शेतकऱ्यांनो दिवाळीत तुमचे डिवाळे काढणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीत परिवर्तन घडवून धडा शिकवा, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी केला.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील दुधगाव येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रसाद पाटील, संदीप सावंत, सरपंच गिरिष पाटील, बाबासाहेब सांद्रे, भरत साजने, शरद पाटील, उमेश आवटी प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) म्हणाले, २००९ साली इस्लामपूर मतदार संघात दुधगावचा समावेश झाला. पण या १५ वर्षात पहिलं दूधगाव व आताचे दुधगाव यामध्ये बराच फरक निर्माण झाला आहे. त्याला एकमेव कारणीभूत येथील आमदार आहेत. त्या माणसाने इथे जाती-पातीच्या भिंती निर्माण केल्या. लोकांना एकत्र करून त्यांच्या सुखदुःखात सामील होणे, हे लोकप्रतिनिधीचे काम असत. पण त्यांनी ते कधी पार पाडले नाही. महापुरात या गावाला पिण्याचे पाणी न्हवते. मला समजल्यावर मी इथे पिण्याची पाण्याची सोय केली. त्यामुळे साथीचे रोग रोखण्यात मदत झाली. त्यानंतर प्रकाश हॉस्पिटलची आरोग्य टीम पाठवून येथील ग्रामस्थांना मोफत आरोग्य सेवा दिली. सर्व झाल्यानंतर विरोधकांना जाग आली. माणूस गेल्यानंतर मदत करून काही उपयोग नसतो, हे पण त्यांना समजत नाही. तीन दिवसानंतर या आमदारांनी आपल्या दोन मुलांचा व आपला फोटो लावलेले पाण्याचे टँकर याठिकाणी पाठवून दिले. हे आजपर्यंत फक्त राजकारणच करत आले आहेत. पण माझ्यावर समाजकारणाचे संस्कार आहेत. दिलेला शब्द पाळणे निशिकांतदादाची खासियत आहे.
यावेळी सुरेखा म्हेत्रे, अक्षय गुरव, बिपीन कुलकर्णी, सोमनाथ गावडे, चेतन पवार, जयदीप आडमुठे, प्रदीप कुंभार, आप्पासाहेब काटकर, प्रदीप म्हेत्रे, जयसिंग नांगरे, सुभाष पाटील, विजय पाटील, अनिल कोले, शीतल आडमुठे, बंडू कागवडे, महावीर वाडकर, प्रकाश आडमुठे, बबन जाधव, सतीश पाखरे, राजू आवळे, सचिन गावडे, सुभाष साजने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
नारळ फोडायची लय हौस तुमच्या नेत्यांना….
परवा इथे कोणीतरी भाषणात म्हटले की, निशिकांतदादा आले आणि नारळ फोडून गेले. पण पाणंद रस्ता काही झाला नाही. पण मी त्यांना सांगेन, नारळ फोडायची हौस तुमच्या नेत्यांना आहे. आजपर्यंत त्यांनी तेच उद्योग केलेत. वर्क ऑर्डर व पावसामुळे हे काम थांबले होते. वर्क ऑर्डर मिळाली, तोपर्यंत आचारसंहिता सुरू झाली. आचारसंहितेनंतर हे काम सुरू होईल. तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद द्या. २४ तारखेला मुंबईला जाऊन शपथ घेऊन येतो व २५ तारखेला हे काम स्वतः उभा राहून करून घेतो. कारण निशिकांत भोसले-पाटील एकदा फोडलेल्या कामाचा नारळ पुन्हा फोडत नाही, असा ही टोला निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी लगावला.