मिरजेत बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त १५० जणांनी केले रक्तदान
मिरज (प्रतिनिधी)
मिरजेतील प्रसिद्ध व्यापारी, पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचे संस्थापक आणि फर्स्ट स्टेप प्री-स्कूलचे अध्यक्ष बंडू शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान, नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १५० रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून दहा रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
अलीकडच्या काळात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा गंभीर स्वरूपाचा झाला असून अनेक मोठ्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन बंडू शेटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला. त्यांच्या आवाहनाला व्यापारी, उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानात सहभाग नोंदवला.
गेल्या १९ वर्षांपासून बंडू शेटे हे पद्मावती शांती सेवा फाउंडेशन आणि मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने या शिबिरात २०९ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून दहा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत पार पडणार आहेत. या उपक्रमात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वसंतदादा ब्लड बँक, उषःकाल हॉस्पिटल आणि एम.एस.आय. ब्लड बँक यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक मकरंद देशपांडे, भाजपचे शेखर इनामदार, माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमाने तसेच सुशांत खाडे, निरंजन आवटी, सागर वणखंडे, करण जामदार, डॉ. सुदान्वा पाठक, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय आणि व्यापारी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बंडू शेटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला.


