दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गांधी चौकी पोलिसांकडून दोघांना अटक, चार दुचाकी जप्त
मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)
शहर व परिसरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात गांधी चौकी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आयुब अब्दुलरशीद मन्ना (वय ३४), संदीप सूर्यकांत येलूरकर (वय ३८, दोघेही रा. नम्रता कॉलनी, बुधगांव, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर रस्ता परिसरातील एका मंगल कार्यालयाजवळ चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी दोन तरुण येणार असल्याची गोपनीय माहिती गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे निर्देश दिले. सूचना मिळताच पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून संशयित दोघांना ताब्यात घेतले. प्रारंभी चौकशी दरम्यान संशय बळावल्याने त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मिरजेतूज एक तर कर्नाटक मधून तीन अशा एकूण ४ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून संबंधित चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई मिरज विभागाचे पोलीस निरीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक संदीप गुरव, सचिन कुंभार, सूरज पाटील, बसवराज कुंदगोळ, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, राजेंद्र हारगे तसेच चालक श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू असून, आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


