मिरजेत श्री मल्हार महोत्सवानिमित्त रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
मिरज (प्रतिनिधी)
शहरातील श्री मल्हार महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री खंडोबा देवालय ट्रस्ट, मगदूम गल्ली यांच्या वतीने श्री खंडोबा यात्रेनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रविवारी (दि.२८) रोजी १० ते २ यावेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे श्री मल्हार महोत्सव समितीकडून सांगण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये अरिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील डॉ. दीपाली जाधव, राधेशाम हॉस्पिटलचे डॉ. विशाल पारेकर तसेच डॉ. तुषार पिड्डे व डॉ. विनायक सुतार यांचेसह तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह रक्तदाब, मधुमेह, वजन, नेत्र तपासणी आदी प्राथमिक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तपासणीदरम्यान आढळणाऱ्या आजारांबाबत तज्ज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन व सल्लाही देण्यात येणार आहे.
श्री खंडोबा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खंडोबा देवालय ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, लिंबु चमचा स्पर्धा, रांगोळी व पाककला स्पर्धांचे देखील आयोजन केले असून त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


