शिस्त, सेवा आणि समर्पणातूनच समाजबदल शक्य : प्रा. एन. डी. बिरनाळे

0
kanya mahavidyaly

एरंडोलीत कन्या महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन
मिरज (प्रतिनिधी)

केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नसून, प्रत्यक्ष समाजाशी संवाद साधल्यानेच खऱ्या अर्थाने शिक्षण पूर्णत्वास जाते. एन.एस.एस. सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना, सहकार्याची वृत्ती आणि सेवाभाव विकसित होतो. शिस्त, सेवा आणि समर्पणातूनच समाजबदल शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी वाणीभुषण प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले.

मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे. एरंडोली ता. मिरज येथे संपन्न होत आहे. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. उल्हास माळकर अध्यक्षस्थानी होते.

चालू शैक्षणिक वर्षातील सातदिवसीय निवासी शिबिराची सुरुवात सलगरेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, सरपंच सौ. वासंती धेंडे, उपसरपंच सौ. सुप्रिया तवटे, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विजयकुमार कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन तवटे, संदीप चौगुले, माजी उपसरपंच सचिन पोतदार, आत्माराम जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाली. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश कट्टीमणी यांनी केले.

स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती, आरोग्य जनजागृती, डिजिटल साक्षरता यांसारख्या उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे काम अशा शिबिरातून होत असल्याची भावना यावेळी तानाजी पाटील यांनी व्यक्त केली. या शिबिराचे संयोजन प्रा.सौ. मानसी शिरगावकर, प्रा.डॉ.बाबासाहेब सरगर, प्रा. विनायक वनमोरे, प्रा. डॉ. संतोष शेळके, प्रा. रचना शहा, प्रा. क्षितिज जाधव यांनी केले. प्रा. डॉ. संतोष शेळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रा. मानसी शिरगावकर यांनी मानले. प्रा. रचना शहा यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *