प्रभाग ५ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे रस्त्यावर

0
1001107417

मिरज (प्रतिनिधी)

प्रभाग क्रमांक ५ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मंत्री तथा मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेशभाऊ खाडे हे स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील चांद कॉलनी परिसरात उमेदवारांसह त्यांनी पदयात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात भाजपच्या प्रचाराला प्रतिसाद दिला.

आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या आमदार निधीतूनच प्रभाग क्रमांक ५ मध्ये रस्ते व ड्रेनेजची मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक असतानाही निधीची कमतरता भासू दिली नसल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे झाल्यास विकासाच्या कोणत्याही समस्या उरणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यंदा भाजपने या प्रभागात चार सर्वसामान्य कुटुंबातील नवख्या उमेदवारांना संधी दिली असून त्यामध्ये राजकुमार कबाडे, बिस्मिल्ला शेख, मीनाक्षी चौगुले आणि राकेश शिंदे यांचा समावेश आहे. भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याने विरोधी गटात खळबळ उडाली असल्याचे चित्र आहे.

पदयात्रेदरम्यान बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले की, प्रभागातील अनेक भागांचा विकास अद्याप अपूर्ण असून यापूर्वी संबंधित नगरसेवकांनी आवश्यक पाठपुरावा केला नाही. भाजपच्या संपूर्ण पॅनलला विजयी करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी संधी देण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

या प्रचार पदयात्रेत स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *