आजार गंभीर होण्याआधीच त्याचे निदान करा:- डॉ.मोहम्मद खान
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व नागरिकांनी आरोग्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.वआजार गंभीर होण्याआधीच त्याचे निदान व उपचार करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. मोहम्मद खान यांनी सांगितले.
बेडग येथील बाळकृष्ण बिल्डिंग फार्म येथे नंदा ग्रुप व सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक, लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच माननीय महेश भाऊ कळंत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कंपनीच्या वतीने रिजनल मॅनेजर कॅप्टन अनुराज जिरग्याल, डॉक्टर विश्वनाथ भोसकर व अक्षय जगताप उपस्थित होते. तर सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मल्लिकार्जुन सोपल, एम.डी. मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद खान, आर.एम.ओ. डॉ. प्रल्हाद भोगम, कॅम्प कोऑर्डिनेटर नंदकुमार सुतार व पवन भगत, ऑप्टोमेट्रिस्ट विशाल ठोंबरे तसेच नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.
या शिबिरामध्ये मधुमेह, नेत्ररोग, रक्तदाब व हृदयरोग आदी आजारांची तपासणी करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी बोलताना सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी वर्षातून किमान दोन वेळा असे आरोग्य शिबिर आयोजित करण्याची सूचना करत उपक्रमाचे कौतुक केले.या आरोग्य शिबिरास कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे शंभर ते सव्वाशे कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला.


