स्त्री – स्त्री समानता प्रस्थापित होणे आजच्या काळाची गरज : डॉ. स्मिता गिरी

0
स्त्री - स्त्री समानता प्रस्थापित होणे आजच्या काळाची गरज

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे होते

कोल्हापूर (प्रतिनिधी) राजर्षी छ. शाहू कॉलेज, कदमवाडी रोड, कोल्हापूर येथे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सबलीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    त्या पुढे म्हणाल्यासावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आणि त्यागातून आजच्या स्त्रिया सन्मानाने जगू लागल्या आहेत. त्या काळातील स्त्रिया शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात याव्यात यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे कष्ट सोसले त्यांचे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. त्यांचा सत्यशोधकी दृष्टिकोन आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या कार्यामुळे स्त्री पुरुष समानता समाजात प्रस्थापित होण्यास मदत झाली. पण आजचा काळ पाहिला तर समाजात स्त्री – स्त्री समानता प्रस्थापित होणे आजच्या काळाची गरज आहे. मोबाईलमध्ये अडकलेल्या आजच्या तरुण पिढीने सावित्रीबाई आणि जोतिबा फुले या दांम्पत्याचा त्याग जाणून घेऊन स्वत:ला शिक्षण घेण्याची जी संधी मिळाली आहे. त्याचा फायदा घ्यायला हवा. असे मत त्यांनी व्यक्त केले.   

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनीनी सावित्रीबाईचा सत्यशोधकी वारसा आत्मसात करीत आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. असे आवाहन केले. 

   याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी विशेष योगदान देणाऱ्या सिनिअर व ज्युनिअर महिला प्राध्यापक यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या व विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका डॉ. पी. बी. पिस्टे, ज्युनिअर विभागातील गणित विषयाच्या प्रा. संयोगिता पाटील यांना आदर्श शिक्षिका व महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारच्या सहाय्यक कुलसचिव श्रीमती बीना निपाणे यांना सावित्रीबाई फुले आदर्श माजी विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  एनसीसी, एनएसएस, सांस्कृतिक व क्रीडा विभागात भरीव कामगिरी करणाऱ्या कु. खाजिदा अत्तार, कु. रशिता कुलाल, कु. तेजस्विनी पाटील, कु. श्रुती भोसले, कु. साक्षी सावंत यांना उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

 कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. एम. बी. देसाई, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. एल. बी. चव्हाण व महाविद्यालयाच्या सिनिअर व ज्यु. विभागाचा सर्व स्टाफ, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. एम. ए. पाटील यांनी तर सूत्रसंचलन डॉ. ए. एच. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. पी. बी. पुदाले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *