प्रभाग ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार पदयात्रा ; सौ.शैला दुर्वे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
WhatsApp Image 2026-01-12 at 9.58.46 PM

मिरज दि.१२ (प्रतिनिधी)
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. गांधी चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, कमानवेस, मंगळवार पेठ मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोपास आली.

या पदयात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. शैला दुर्वे, दिगंबर जाधव तसेच शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे उमेदवार सागर वनखंडे व रेश्मा चौधरी यांच्या प्रचारार्थ नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी संजयकाका पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्राधान्याने काम करण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, सौ. शैला दुर्वे व त्यांचे पती शिवाजी दुर्वे यांनी सहकाऱ्यांसह प्रभागातील विविध भागांत घरोघरी भेटी देत प्रचार केला. या घरगुती भेटीदरम्यान नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. सौ. शैला दुर्वे यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

नागरिकांशी संवाद साधताना सौ. शैला शिवाजी दुर्वे यांनी निवडून आल्यानंतर प्रभागाच्या विकासासाठी ठोस आराखडा राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र उभारणे, युवकांसाठी अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करणे, तसेच महिलांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना गती देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे साध्य करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी नागरिकांना दिला. या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून निवडणूक वातावरण अधिकच तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *