पारंपारिककलेला पर्यटन संधीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे: विनोद विजय साळुंखे सरकार
कार्यशाळेचे स्वागतपर मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांनी केले
कोल्हापूर (प्रतिनिधी) नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर मध्ये भूगोल विभागामार्फत आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायांच्या संधी याविषयावरील एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना विनोद विजय साळुंखे सरकार यांनी पारंपारिक कलेला पर्यटन संधीच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. तसेच लाटी काठी, तलवारबाजी दांडपट्टा, लेझीम इत्यादी क्रीडा प्रकार कशा आपल्याला पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेल्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी आपल्या भाषणातून कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि खाद्य पर्यटन संधी बाबत माहिती दिली. भाषा कौशल्यातून पर्यटन संधी कशी प्राप्त होते हे, याकार्यशाळेच्या स्वागतपर मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शक प्रा. डॉ. ज्योत्स्ना शिवनकर यांनी पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा संदर्भात आवश्यक असलेल्या बदलाबाबत आवश्यक सूचना सुचवल्या. या सत्राच्या अध्यक्षस्थानी लाभलेले प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे यांनी कोल्हापूर शहराला लाभलेल्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि ही परंपरा, प्राचीन वास्तू याची विद्यार्थ्यांनी जपणूक करणे आवश्यक आहे मत व्यक्त केले.
तिसऱ्या सत्रातील मार्गदर्शक प्रा. डॉ. डी. व्ही. सुर्यवंशी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाची प्रसिद्धी कशी करावी व त्यातून कशाप्रकारे रोजगार, व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील याविषयी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान दिले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा. डॉ. डी. एल कशिद पाटील यांनी आपण प्रत्येकाने पर्यटनासाठी बाहेर पडले पाहिजे तरच पर्यटनाला चालना मिळेल अशी मतव्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. तसेच कार्यशाळेच्या प्रास्ताविक मध्ये संयोजक प्रा. डॉ. एस. पी. सुर्यवंशी यांनी अग्रणी महाविद्यालय योजनाचा उद्देश, कार्यशाळेच्या विषयाची महत्त्व याबाबत माहिती देऊन प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. ए. गावडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. एम. ए. जाधव यांनी मानले. या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील विविध महाविद्यालयातून ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


