मिरजेत भानामतीचा प्रकार सुरूच ; प्रभाग १९ मध्ये भोकरे नर्सिंग कॉलेज येथे वोटिंग मशीन जवळ ‘लिंबू’
मिरज (प्रतिनिधी)
ऐन निवडणुकांच्या धामधुमीत शहरात अंधश्रद्धा आणि भानामतीसारख्या प्रकारांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ मधील भोकरे फार्मसी कॉलेज येथे मतदान केंद्रात व्होटिंग मशीनजवळ लिंबू ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रभाग ७ मध्ये बुधवारी नुकताच असाच प्रकार आढळून आला होता.
मतदानाच्या पवित्र प्रक्रियेत अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संध्याकाळी निवडणूक अधिकारी व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित लिंबू तात्काळ हटवून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यात आली. लिंबू वर उर्दू भाषेत मजकूर लिहिला गेला असून पांढऱ्या कागदात गुंडाळून सदर लिंबू वोटिंग मशीन जवळ ठेवण्यात आला होता.
लोकशाहीच्या उत्सवात अशा प्रकारचे गैरप्रकार निंदनीय असून, यामागे कोणाचा हात आहे याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाने यावेळी केले. लोकशाही प्रक्रियेची पवित्रता अबाधित राखण्यासाठी अशा घटनांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.


