बिऊर (ता. शिराळा) येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

0
bibtya-d

शिराळा / प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून शिराळा तालुक्यात धुमाकूळ घालून अनेक जीवांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सदर बिबट्यास वनविभागामार्फत पुणे येथील बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, बिऊर (ता. शिराळा) येथील सहा वर्षीय बालक राजवीर हनुमंत पाटील याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर परिसरात व तालुक्यात वनविभागाविरोधात राजकीय व सामाजिक स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. बिबट्याला पकडण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलनांद्वारे जनक्षोभ व्यक्त होत होता. परिस्थितीची गंभीर दखल घेत वनविभागाने संबंधित परिसरात ट्रॅप कॅमेरे व लोखंडी सापळे बसवले होते. तसेच विशेष डॉग स्कॉड पथकही पाचारण करण्यात आले होते. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले होते. दि. ३० जानेवारी रोजी मौजे बिऊर, अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हनुमंत पाटील (वय ५) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संबंधित ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी सापळा लावण्यात आला होता.

स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तसेच वनअधिकारी, कर्मचारी, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक प्रा. सुशीलकुमार गायकवाड व त्यांची टीम, कोल्हापूर व पुणे येथील RRT पथक तसेच पुणे येथील श्वानपथकाच्या मदतीने दिवसा व रात्री अत्याधुनिक थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध सुरू होता. दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी लावण्यात आलेल्या त्याच लोखंडी सापळ्यात सदर बिबट्या अडकला. त्यानंतर त्याला सांगली येथील उपवनसंरक्षक कार्यालयात आणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या सुस्थितीत आढळून आल्याने त्याला पुणे येथील बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई जी. गुरूप्रसाद, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर, सागर गवते, उपवनसंरक्षक (प्रा.) सांगली, तसेच नवनाथ कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (वनी.) सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत रमेश कांबळे, वनक्षेत्रपाल (प्रा.) शिराळा (अति. कार्यभार), सौ. शामला खोत, तहसीलदार शिराळा, अनिल वाजे, वनपाल बिळाशी, दत्तात्रय शिंदे, वनरक्षक बिऊर, रजनिकांत दरेकर, वनरक्षक बिळाशी, जंबाजी भोसले, पोलीस निरीक्षक शिराळा, वरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शशिकांत पाटील, उदय पाटील, पोलीस उपनिरीक्षक, कुंभार, हवालदार, मांगले, पोलीस शिपाई, तसेच धीरज गायकवाड, पंकज कदम, मिलिंद गायकवाड, संपत देसाई, संतोष कदम, सचिन पाटील, हर्षल जाधव, नामदेव सीद, राहुल पाटील, संजय पाटील यांच्यासह प्राणीमित्र व कायम वनमजुरांनी सहभाग घेतला.

सापळ्यात सापडलेला सदर बिबट्या नरभक्षक असल्याचे निष्पन्न झाल्याने, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात न सोडता पुणे येथील बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *