शाहूवाडी जि.प. व पं.स. निवडणुक, सभापती निवडीचा प्रश्न
सरूडकर-गायकवाड महाआघाडी व जनसुराज्य युतीस सम-समान संधी
सरूड (प्रतिनिधी) शाहूवाडी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी समसमान कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शाहूवाडी पंचायत समितीवर सरूडकर-गायकवाड महाआघाडी व जनसुराज्य युती या दोन्ही गटांना समान संधी मिळाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येकी दोन जागा, तर पंचायत समितीमध्ये प्रत्येकी चार जागा मिळाल्याने सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पंचायत समिती सभापती पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत सरूड जिल्हा परिषद मतदारसंघावर माजी आमदार सत्यजित पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले. तसेच बांबवडे मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणवीरसिंह गायकवाड यांचे वर्चस्वही कायम राहिले. तर आंबर्डे व शित्तूर वारूण जिल्हा परिषद मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाने आपले वर्चस्व प्रस्थापित करत परिवर्तन घडवले आहे.
विशेष म्हणजे, शित्तूर वारूण मतदारसंघात सर्जेराव पेरिडकर यांनी आपला गड कायम राखला असून आंबर्डे मतदारसंघात जनसुराज्य पक्षाने जोरदार मुसंडी मारत परिवर्तन घडवून आणले आहे. दरम्यान, शाहूवाडी पंचायत समितीमध्ये एकूण आठ गण असून येथे जनसुराज्य पक्षाला चार जागा, तर सत्यजित पाटील (सरूडकर) व मानसिंगराव गायकवाड यांच्या आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद विजयी उमेदवार
राजकुवर रणवीरसिंह गायकवाड (राष्ट्रवादी अजितदादा गट)
अमरसिंह हंबीरराव पाटील (उबाटा)
सर्जेराव बंडू पाटील (जनसुराज्य)
स्नेहल केतन वेल्हाळ (जनसुराज्य)
पंचायत समिती विजयी उमेदवार
अभयसिंह बाळासो चौगुले (राष्ट्रवादी)
लक्ष्मी बाबुराव पाटील (राष्ट्रवादी)
डॉ. धनश्री जयवंत पाटील (उबाटा)
माधुरी दिलीप पाटील (उबाटा)
सुरेश पवार (जनसुराज्य)
राजेश पांडुरंग पाटील (जनसुराज्य)
अमरसिंह नारायण खोत (जनसुराज्य)
प्रियांका तानाजी भोसले (जनसुराज्य)
मतदारांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत समसमान कौल दिल्याने राजकीय समीकरणे बदलली असून आता सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.


