कमला कॉलेजमध्ये ‘विकसित भारत @२०४७’ वर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव श्री. प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, चर्चासत्राचे निमंत्रक डॉ. तानाजी घागरे आणि समन्वयक श्रीमती अश्विनी कुंभार उपस्थित होते.
कोल्हापूर. (प्रतिनिधी)ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज (स्वायत्त) येथे ‘विकसित भारत @२०४७ : संधी आणि आव्हाने’ या विषयावर आयोजित केलेले एकदिवसीय बहु-विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात देशाच्या भविष्यातील प्रगतीचा आराखडा मांडतानाच, त्यापुढील आव्हानांवरही सखोल मंथन करण्यात आले. चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एस. देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव श्री. प्राजक्त पाटील, प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, चर्चासत्राचे निमंत्रक डॉ. तानाजी घागरे आणि समन्वयक श्रीमती अश्विनी कुंभार मान्यवर उपस्थित होती.
उद्घाटनप्रसंगी डॉ. एम. एस. देशमुख यांनी बीजभाषण करताना विकसित भारताच्या संकल्पनेवर व्यापक भाष्य केले. त्यांनी सांगितले की, केवळ आर्थिक वृद्धी म्हणजे विकास नव्हे; तर शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि पर्यावरणीय संतुलन या घटकांचा समतोल साधणारा सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे. विकसित राष्ट्र होण्यासाठी देशात शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर मोठे बदल घडवून आणावे लागतील. त्यांनी कृषी, उद्योग आणि सेवा या तीन प्रमुख क्षेत्रांच्या संतुलित आणि संरचनात्मक विकासावर भर दिला. डॉ. देशमुख यांनी पुढे शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर विशेष भर दिला. भविष्यातील पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संसाधनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. भारतासमोर आर्थिक विषमता आणि दारिद्र्य निर्मूलन ही मोठी आव्हाने आहेत. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी समावेशक धोरणे राबविणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारताच्या ‘लोकसंख्या लाभांशा’वरही प्रकाश टाकला. पुढील काही दशके भारताकडे तरुणांची मोठी संख्या असणार आहे, ही देशासाठी मोठी संधी आहे. या तरुण शक्तीचा योग्य उपयोग केल्यास भारत वेगाने विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करू शकतो. मात्र, यासाठी तरुणांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता संशोधन, नवोन्मेष, उद्योजकता आणि धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि संशोधनाला प्रोत्साहन दिल्यास भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न साकार करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तांत्रिक सत्रांमध्ये सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अनिलकुमार वावरे आणि दिल्ली येथील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राध्यापक डॉ. सूर्य प्रकाश यांनी मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये भारतातील स्टार्ट-अप संस्कृती, नवोन्मेष आणि तांत्रिक प्रगती यांवर सखोल चर्चा झाली. या चर्चासत्रात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून आलेल्या संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध सादर केले. अर्थव्यवस्था, शिक्षण, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, पर्यावरण, उद्योग आणि सामाजिक परिवर्तन या विविध विषयांवर आधारित संशोधन सादरीकरणांमुळे चर्चासत्र अधिक समृद्ध झाले.
चर्चासत्राचा समारोप डॉ. नीता धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती कांबळे यांनी केले, तर श्रीमती आरोही मोघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या चर्चासत्रात देशातील विविध राज्यातून संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


