दैनंदिन जीवनासाठी संख्याशास्त्र उपयुक्त – डॉ. पी. वाय. पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते.
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोणत्याही प्रकारच्या विदे विवरण ही संख्याशास्त्राशी निगडीत आहे. विदे विश्लेषण आणि ग्राफिकल मांडणी आपल्या करावीच लागते. त्यासाठी संख्याशास्त्र उपयुक्त ठरते. आपण संख्याशास्त्राशी मैत्री करून त्या विदेतील मानवी जीवनाला उपयुक्त असा बोध करून घेवू शकतो. छोट्यातील छोट्या आणि मोठ्यातील मोठ्या विश्लेषणासाठी संख्याशास्त्र उपयुक्त ठरते. आपल्या आयुष्यातील अनेक गणिते सोपी करायला संख्याशास्त्र उपयुक्त ठरते. त्यामुळेच दैनंदिन जीवनात संख्याशास्त्राची उपयुक्तता अमूल्य आहे. असे मत शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. पी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छ. शाहू कॉलेज कदमवाडी रोड कोल्हापूर येथे संख्याशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या एक दिवसीय अग्रणी महाविद्यालय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. डॉ. भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संख्याशास्त्र ह्या विषयातील रोजगाराच्या संधींचा ऊहापोह केला. तसेच उपस्थितांना महाविद्यालयातील विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यशाळेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण संख्याशास्त्र व ग्रामीण विकास विभागाचे डॉ. संतोष सुतार, शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे डॉ. सोमनाथ पवार आणि जिल्हा संख्याशास्त्र विभागाचे सांख्यिकी अधिकारी श्री. गजानन पाटील हे उपस्थित होते. डॉ. संतोष सुतार यांनी आकडे काय सांगतात कोण किती खातो, डॉ. सोमनाथ पवार यांनी काय सांगतात पाऊलखुणा, गजानन पाटील यांनी राज्यशासनातील संख्याशास्त्राचे महत्त्व या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटनेच्या आर्थिक सहकार्यातून ही कार्यशाळा संपन्न झाली. ह्या कार्यशाळेस महाविद्यालयाच्या आयक्युएससी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. पी. बी. पिस्टे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. एम. बी. देसाई, कला विभागाच्या उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे, प्रो. डॉ. व्ही. सी. शिंदे, कोल्हापूर परिसरातील विविध महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. टी. एस. कुरणे, सूत्रसंचालन कु. समृद्धी कोळेकर व समीक्षा पोकळे तर आभारप्रदर्शन डॉ. अर्चना पाटील यांनी केले.


