प्राचार्या सुमतीबाई पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराच्या शिलेदार – डॉ. सुमंत जगताप
डॉ. सुमतीबाई पाटील : जीवन व कार्य ह्या विशेष व्याख्यानात डॉ. सुमंत जगताप बोलत होते
कोल्हापूर (प्रतिनिधी) गोरगरिबांच्या झोपडीपर्यत शिक्षणाचा प्रकाश घेवून जाण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. कर्मवीरांच्या नंतर हे कार्य अविरतपणे पुढे नेण्यामध्ये ज्यांनी योगदान दिले त्यामध्ये प्राचार्या, सुमतीबाई पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सुमतीबाईचे संपूर्ण जीवन हे कर्मवीरांच्या विचाराने भारावलेले होते. त्या कर्मवीरांच्या विचारांच्या शिलेदार होत्या. असे विचार डॉ. सुमंत जगताप यांनी व्याख्यानात मांडले.
राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाचा सेवक कल्याण विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्राचार्या, डॉ. सुमतीबाई पाटील : जीवन व कार्य ह्या विशेष व्याख्यानात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. सुमंत जगताप यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या विवेचनामध्ये बॅ. पी. जी. पाटील व प्राचार्या, डॉ. सुमतीबाई पाटील ह्या दांपत्याचे शैक्षणिक कार्य, रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. डी. आर. भोसले हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये आपल्याला इतरांच्या स्मरणात राहायचे असेल तर आपणही बॅ. पी. जी. पाटील व प्राचार्या, डॉ. सुमतीबाई पाटील यांच्याप्रमाणे कार्य करायला हवे. विद्यार्थ्यांनी वेळीच आपल्यातील क्षमता ओळखावी. अंगी असणारी ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च करावी, जेणेकरून आपल्यालाही सुमतीबाई यांच्यासारखा असा लौकिक प्राप्त करता येईल. असे मत व्यक्त केले.
व्याख्यानास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अॅड. सदानंद चिंगळे, प्रा. डी. बी. रैनाक, महाविद्यालयाच्या आयक्युएसी प्रमुख डॉ. यु. एस. शेळके, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या, डॉ. एम. बी. देसाई, कला विभागाचे उपप्राचार्य, डॉ. ए. पी. उबाळे,महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या व्याख्यानाचे प्रास्ताविक प्रा. एस. पी. मुलाणी, सूत्रसंचालन डॉ. श्यामल हुंबरे यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. डी. ए. माळवेकर यांनी केले.


