राजवीर पब्लिक स्कूलला पेटंटचा बहुमान
फोल्डेबल युटेन्सिल स्टॅन्ड निर्मितीस राष्ट्रीय मान्यता
हळदी. (प्रतिनिधी) शिक्षणासोबत संशोधन व नवोपक्रम यांची सांगड घालत वाशी ता.करवीर येथील राजवीर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘फोल्डेबल युटेन्सिल स्टॅन्ड’ या नाविन्यपूर्ण उत्पादनास भारत सरकारकडून मान्यता प्राप्त पेटंट बहाल करण्यात आले असून या यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू चरित्र अभ्यासक जे. के. पवार उपस्थित होते. भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणांतर्गत अटल टिंकरिंग लॅबमध्ये विविध संशोधनात्मक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने ‘ड सॉल्ट सिस्टीम’ व ‘ला फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून आयोजित इनोव्हेशन स्पर्धेत राजवीर स्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
रिद्धी तेली, निकिता कुंभार, दीपिका बन्ने, समीरा शेटे, सृष्टी पाटील व शर्वरी जाधव यांनी संयुक्तपणे संशोधन करत फोल्डेबल युटेन्सिल स्टॅन्डची निर्मिती केली. दैनंदिन वापरासाठी उपयुक्त व कमी जागेत साठवता येणारे हे उत्पादन त्यांच्या कल्पकता, मेहनत व जिद्दीचे प्रतीक ठरले. या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यास पेटंट प्रदान केले आहे. त्यामुळे शाळेचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधिक उजळले आहे.
या यशामागे पथमार्गदर्शिका अरुंधती जाधव, मुख्याध्यापिका वैष्णवी सरनोबत, अटल इन्चार्ज शिल्पा पाटील व गायत्री गोखले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी ए. एस. भागाजे, संस्थापक अध्यक्ष बी. ए. पाटील, उपाध्यक्ष एम. एस. पाटील, भोगावती कारखान्याचे कार्यकारी संचालक सागर पाटील, माजी संचालिका अनिता पाटील, नंदकुमार पाटील, केरबा शेळके, शिवाजी पाटील, पांडुरंग माळी, के. एल. खाडे, शिवाजी बरगे यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, दहावीतील विद्यार्थिनींना चंद्रभागा पाटील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली. सूत्रसंचालन उमा कलकुटकी यांनी केले, तर आभार भागोजी पुजारी यांनी मानले.


