काँग्रेस सरकारच्या हजारोंवर समस्या ः आमदार शशिकला जोल्ले

0
IMG-20260214-WA0219

चिक्कोडी,ता.14(प्रतिनिधी)-
कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या सत्तेच्या हजार दिवसांच्या पार्श्‍वभूमीवर “हजारोंवर हजार समस्या” असा कारभार केला आहे. राज्यातील विकास ठप्प, भ्रष्टाचार बळावलेला, कायदा व सुव्यवस्था ढासळलेली, शेतकरी आणि युवक संकटात, तर महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा आरोप निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी केला.एकसंबा येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
आमदार जोल्ले म्हणाल्या, काँग्रेस सरकार हजार दिवसांचा उत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील जनता विविध समस्यांनी हैराण झाली आहे. हा उत्सव म्हणजे जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरच विविध प्रकरणांत आरोप झाले आहेत.
अलीकडेच अबकारी विभागाशी संबंधित ऑडिओ क्लिप्समधून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले आहे. अनेक कंत्राटदारांनी या सरकारला “60 टक्के कमिशन सरकार” अशी उपाधी दिल्याचा दावाही करण्यात आला.सर्वसामान्यांच्या खिशावर कात्री चालविण्यात आली आहे. मृत्यू प्रमाणपत्राच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून दूध, वीज, पाणी, इंधन यांसह दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तूंचे दर वाढले आहेत.
अवघ्या दोन वर्षांत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.एससी-एसटी विकासासाठी राखीव असलेला निधी गॅरंटी योजनांकडे वळवण्यात आला. दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना रद्द केली.गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम थकवूनही सर्व पैसे अदा केल्याचे दावे करण्यात आल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.राज्याच्या विविध भागांत दिवसा ढवळ्या दरोडे, ड्रग्स जाळे, कारागृहांतील गैरप्रकार उघडकीस आल्याने कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलली आहे.काँग्रेस सरकारने अवघ्या दोन वर्षांत राज्यावर प्रचंड कर्जाचा बोजा टाकला आहे.माजी आमदार संजय पाटील यांनीही काँग्रेस सरकारवरआरोप केला.यावेळी बीडीसीसी अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, राजू गुंदेशा, सतीश अप्पाजीगोळ व मान्यवर उपस्थित होते. अमृत कुलकर्णी यांनी स्वागत करून आभार मानले.
महत्वाचे आरोप
म्हैसूर मुडा घोटाळा 3500 कोटी, वाल्मीकी महामंडळ घोटाळा 178 कोटी, वक्फ बोर्डकडून बेकायदेशीर रक्कम हस्तांतरण, अकरा विभाग व 9 महामंडळांत 42.88 कोटींचा अपहार, अबकारी विभागात 700 कोटींची वसुली, स्मार्ट मीटर घोटाळा 15,500 कोटी, हेस्कॉम ट्रान्सफॉर्मर घोटाळा-90 कोटी, अन्नभाग्य तांदळाचा काळाबाजार, गृहलक्ष्मी योजनेत खासगी एजंटांचा सुळसुळाट, कायदा व सुव्यवस्था अपयश, 2.5 वर्षांत 2422 शेतकरी आत्महत्या, विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थनाथ घोषणा, हिंदू कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे, गडपारी, राज्यात ड्रग्स पुरवठा जाळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *